कारागृहात असलेले लेखक-कवी वरवरा राव यांना तळोजा कारागृहात चक्कर, JJ मध्ये केलं दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – काल रात्री चक्कर आल्याच्या कारणावरुन तळोजा कारागृहात शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून खालावत जाणारी प्रकृती आणि वाढता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवरती जामीन देण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

८१ वर्षीय वरवरा राव यांना आरोग्याच्या कारणास्तव राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी याचिका दाखल केली असून, विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची देखील मागणी राव यांनी केली आहे. त्यांच्यासोबत या प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सुद्धा जमीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

राव यांच्या कुटूंबीयांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे पत्रकार परिषद घेत म्हटलं होत की, शनिवारी सायंकाळी राव यांनी आपल्याला दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, तसेच कारागृहात त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्यानंतर राव यांच्या वकिलाने रविवारीच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करत त्यावर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.

तर सोमवारी देखील त्यांच्या वकिलाने कारागृह प्रशासनाविरुद्ध याचिका दाखल केली. त्यात जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या निर्देशानुसार राव यांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याचा दावा करण्यात आला. शिवाय, कारागृह अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी करत, राव यांच्या वैद्यकीय तपासणीचा आणि त्यानुसार त्यांना काय सुविधा उपलब्ध करुन दिल्या याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.