Vijay Shivtare | विजय शिवतारे ‘त्या’ व्हायरल पत्रावर स्पष्टच बोलले, ”ते विरोधकांनी लिहिलेलं होतं, आमचा शिवसैनिक…”

पुणे : हे पत्र विरोधकांनी लिहिलेले होते. आमचा शिवसैनिक माझ्याबद्दल काही पत्रबित्र लिहीत नाही. त्याला भांडायचे असेल तर तो माझ्याकडे येऊन भांडतो. घरातल्या बापाशी जसा पोरगा भांडतो तसा माझा शिवसैनिक माझ्याशी येऊन भांडतो. बाप जसा शिव्या देतो, ओरडतो, मारतो, थोबाडीत देतो तेवढे सुद्धा मी करतो. ते रिलेशन आमचे वेगळे आहे, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी त्या व्हायरल पत्रावर दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडण्याचा (Baramati Lok Sabha) निर्णय मागे घेतल्यानंतर एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रावर शिवतारे यांनी आज प्रतिक्रिया दिली. शिवतारे म्हणाले, त्यांनी पत्र लिहिताना सनविवि लिहिलेले आहे. खरा शिवसैनिक असता तर सप्रेम जय महाराष्ट्र लिहिले असते. त्यामुळे ते पत्र कोणी लिहिलेला आहे ते ट्रेस झाले आहे.

शिवतारे पुढे म्हणाले, पण एवढ्या छोट्या लोकांना एक्स्पोज करण्यात वेळ घालवायचा नाही. जे काय उत्तर द्यायचे आहे ते माझ्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही.

सासवडला होत असलेल्या सभेची माहिती देताना शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपुमख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सासवडला सभा होणार आहे. ही जनसंवाद आणि शेतकऱ्यांशी संवाद सभा आहे. एखादी गोष्ट युद्ध करून जिंकून मिळवता येते. पण तहात ती गोष्ट मिळाली तर युद्ध करण्याचे कारण नाही.

शिवतारे म्हणाले, एअरपोर्ट, गुंजवणीचे पाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. त्या स्वतः मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेला सांगतील. माघार घेताना काय काय ठरले हे स्वतः ते सांगतील. ५० हजार लोकांच्या क्षमतेइतकी मोठी ही सभा होईल.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरंदरच्या पालखी मैदानावरून माफी मागावी, अशी मागणी शिवतारे यांनी केली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले, एवढी चर्चा झाल्यानंतर आता तशी काही अपेक्षा नाही. पण त्यांना जे वाटेल ते ते बोलतील. पाच वर्षे प्रकल्प लेट झाले, त्यांनी वेगळा सूर धरला ठीक आहे. पण आता त्याला चालना मिळत आहे. पाच वर्षात जी कामे झाली नाहीत ती एक वर्षात करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फडणवीसांचे पक्षातील वजन कमी झालंय का? अंधारेंच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण, ”त्यांना विनोद तावडेंनी चितपट केलंय”