‘एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा अयोग्य’, विजय वडेट्टीवारांची खा. छत्रपती संभाजीराजेंवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आता मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय असं दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन असा सज्जड इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजापुरातून दिला. यावरून आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची आहे असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

‘एखाद्या समाजासाठी तलवार काढणं ही भाषा योग्य नाही’
वडेट्टीवार म्हणाले, “बहुजन लोकांसाठी आरक्षण देणाऱ्या राजाचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत इतर बलुतेदार होते. विरोध करणारे मोरे, जावळे होते. हा इतिहास आहे. राजाची भूमिका जनतेची हवी, केवळ एखाद्या समाजासाठी तलवार काढणं ही भाषा योग्य नाही” असं म्हणत वडेट्टीवारांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे.

‘समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतात’
“संभाजीराजे असो किंवा प्रकाश आंबेडकर समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करत आहेत. त्याचा राजकीय फायदा कोणाला व्हावा हा उद्देश आहे. हे राज्यातील जनतेला चांगल्या प्रकारे समजतं. राजकीय पक्षाची झूल घालून कोण काय विधान करतं हे समजतं. दोन्ही राजांनी तडजोडीची भाषा केली पाहिजे. कोणत्या समाजाचे नुकसान व्हायला नको” असंही वडेट्टीवार म्हणाले.