‘त्या’ वेळी विलासराव देशमुख हे रितेशच्या चित्रपटासाठी प्रयत्न करत होते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा बाकी असताना राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर कठोर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

ज्यावेळी २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी विलासराव हे आपल्या मुलाच्या चित्रपटासाठी प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. लुधियाणा येथे झालेल्या कार्यक्रमात गोयल बोलत होते.पुढे बोलताना गोयल म्हणाले, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. हे काँग्रेसचे सरकार कमजोर होते. तीन दिवस येथे हल्लेखोर गोळीबार करीत होते तरी या सरकारने काहीही केले नाही.

त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ज्या ओबेरॉय हॉटेलमध्ये गोळीबार सुरू होता त्या ठिकाणी एका निर्मात्याला घेऊन आले होते. या निर्मात्याच्या चित्रपटात त्यांचा मुलगा रितेशला भूमिका मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
आपले सैन्य दल ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम होते.

मात्र याबाबत निर्णय हा राज्याच्या नेतृत्वाने घ्यायचा असतो. त्यावेळी आपल्या सुरक्षा रक्षकांना हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची परवानगी मिळेल असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. यावरूनच ते सरकार भित्रे असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत गोयल यांनी काँग्रेसवर टीका केली.