मनसेच्या मंचावरील ‘त्या’ कुटुंबाचा पाकिस्तानशी संबंध : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘मोदी है तो मुमकीन है’ या जाहिरातीमधील चिले कुटुंबाला समोर आणून मोदींच्या खोट्या जाहीरातीची पोलखोल केली. तर मंचावर बोलावलेल्या चिले कुटुंबाचा संबध शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाकिस्तानशी जोडला आहे. भाजपचे आयटी सेलवाले कोणाचीही फोटो घेवून त्याचा उपयोग जाहीरातीसाठी करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

विनोद तावडे म्हणाले, संबुद्धा मित्र मुस्तफी यांनी एक मुलाखत घेतली होती. त्यांना मनसेचे कार्यकर्ते असलेल्या चिलेंना मुलाखत दिली होती. त्यावेळी घेतला गेलेला हा फोटो आहे. हा फोटो चिले कुटुंबीयांनी स्वत:हून दिलेला असल्याचेही तावडे यांनी सांगितले. तसेच पाकिस्तान डिफेन्स नावाच्या पेजवरही याच कुटुंबाचा फोटो भारतातील मिडल क्लास फॅमिली म्हणून दाखवलेला आहे. पाकिस्तान डिफेन्स पेज हे पाकिस्तान संरक्षणखात्याचे अधिकृत पेज नसल्याचे तावडे म्हणाले.

इम्रान खान जे म्हणतात त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी बोलत नाही मात्र मनसेच बोलते. राज ठाकरे हे पाकिस्तान मीडियातील हिरो होतात. यावरून मनसे-पाकिस्तान असेही काही कनेक्शन आहे का ? याची चौकशी व्हायला हवी, असे तावडे म्हणाले. ज्या परिवाराचा फोटो वेगवेगळ्या ठिकाणी मिडल क्लास इंडियन फॅमिली म्हणून वापरला गेला, तोच फोटो दाखवून उगाच काहीतरी सनसनाटी क्रिएट करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतात, असेही तावडे म्हणाले.