मुंबईतील महिला डॉक्टर PPE कीटमध्येच ‘हाय गर्मी’वर थिरकली

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटात जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर धीराने तोंड देत आहे. यासाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास या कर्मचार्‍यांना पीपीईमध्ये (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) राहूनच रुग्णांवर उपचार करावे लागतात. या पीपीई कीटमध्ये अंगाची अगदी लाही लाही होते असा अनुभव डॉक्टर्स सांगत आहेत. घामाने जणून काही अंघोळ केली आहे की काय असे वाटावे इतका घाम आलेले डॉक्टरांचे पीपीई कीट काढल्यानंतरचे काही फोटोही सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले होते.

कठीण परिस्थितीमध्येही जीव धोक्यात घालून डॉक्टर कोरोनाबाधितांवर उपचार करत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांवरही प्रचंड मानसिक ताण आहे. कामाचे वाढीव तास, वाढती संख्या, स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड अशा बर्‍याच गोष्टी डॉक्टरांना हाताळाव्या लागत आहेत. अशातच मुंबईतील एका तरुण महिला डॉक्टरने पीपीई कीट घालून डान्स करतानाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर डॉक्टर्स डेच्या दिवशीच पोस्ट केला आहे. मुंबईमधील रिचा नेगी या महिला डॉक्टरनेच पुढाकार घेतला आहे. जरी आम्ही स्वत: या गर्मी होणार्‍या मात्र तितक्याच सुंदर दिसणार्‍या पोशाखामध्ये असतो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नकारात्मकतेला आम्ही दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही या वाढवलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये थोडं सकारात्मक राहणं गरजेचं आहे, असं रिचा या पोस्टमध्ये म्हणते. डॉक्टर्स डे आणि 1 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये महिनाभरासाठी वाढलेल्या लॉकडाउनची सांगड घालत रिचाने सर्व सामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असं आवाहन केले आहे.