पोलिसांच्या भीतीने ‘स्पायडरमॅन’चा लिफ्टने प्रवास, व्हिडीओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांना प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, काही मंडळी विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा मंडळींना जागृत करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी स्पायडरमॅनचा एक गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

स्पायडरमॅन म्हटले की उंच इमारतींवरुन उड्या मारणारा एक सुपरहिरो डोळ्यांसमोर येतो. मात्र या व्हिडीओमधील स्पायडरमॅन लॉकडाउनमुळे चक्क लिफ्टमधून प्रवास करताना दिसत आहे. पोलिसांच्या भीतीमुळे तो बाहेर जाऊन उडू शकत नाही. या गंमतीशीर व्हिडीओमार्फत पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.