विरारमध्ये दोन गटातील तलवारीच्या हल्ल्यात 1 ठार, 3 जखमी

पोलिसनामा ऑनलाईन – भरदिवसा रस्त्यामध्ये शिकलकरी समाजाच्या दोन गटात विरारमध्ये हाणामारी झाली. तलवारीच्या हाणामारीत चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिल्लासिंग टाक असे ठार झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनही गटात मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. त्यावरून काल दुपारी विरार चंदनसार परिसरात साईनाथ झोपडपट्टी येथे राहणार्‍या टाक कुटुंबांवर काही इसमांनी तलवारीने हल्ला केला. यात जखमी झालेल्या पिल्लासिंग टाक याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात टक्कूसिंग,चिमनसिंग,राहुल हे जखमी झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.