विश्व हिंदू परिषदेच्या होशंगाबाद जिल्हा गोरक्ष प्रमुखाची गोळ्या घालून हत्या, दोन जण जखमी

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे होशंगाबाद जिल्हा गोरक्ष प्रमुख रवी विश्वकर्मा यांच्यावर काठी व धारदार शस्त्राने हल्ला करून गोळी घालून ठार मारण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा ३५ वर्षीय रवि विश्वकर्मा आपल्या दोन साथीदारांसह कारमधून होशंगाबादहून पिपरीया येथे परत जात होते.

पिपरिया पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश अंधवान यांनी शनिवारी सांगितले की, परत येताना पिपारिया येथे १० जणांनी रवि विश्वकर्मा यांच्यावर धारदार शस्त्रे व काठीने हल्ला केला. नंतर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विश्वकर्मा यांना दोन गोळ्या लागल्या. एक हातावर आणि दुसरी त्यांच्या दुसऱ्या हाताला लागून नंतर छातीत लागली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात रवि विश्वकर्मा यांचे दोन साथीदारही जखमी झाले आहेत. हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

सतीश अंधवान यांनी सांगितले की, याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. परस्पर शत्रुत्वामुळे हा खून केला गेला असावा असे त्यांनी सांगितले. या घटनेवर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री गोपाल सोनी यांनी सांगितले की, ही नियोजित हत्या आहे. रवी विश्वकर्मा जिल्ह्यातील गायींचे संरक्षण करण्याचे काम करत होते. या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे.