बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगळुरू पोलिसांचा छापा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  cच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा सुरू केला. विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा प्रकरणात हे छापे टाकण्यात येत आहे. बेंगळुरू पोलिस सर्च वॉरंटसह जुहू येथील विवेक ओबेरॉयच्या घरी पोहोचले आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने या छापाबद्दल सांगितले की, ‘आदित्य अल्वा फरार आहे. विवेक ओबेरॉय हा त्याचा नातेवाईक आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अल्वा त्याच्या घरात लपला आहे. म्हणून आम्हाला तपास घ्यायचा होता. यासाठी कोर्टाकडून वॉरंट घेण्यात आले आणि आमची गुन्हे शाखेची टीम बेंगळुरुहून मुंबईत त्याच्या घरी गेली.

पोलिसांनी बंगळुरूमध्ये आदित्य अल्वाच्या घराची झडतीही घेतली आहे. दरम्यान, आदित्य अल्वा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील गायक आणि कलाकारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, कन्नड फिल्म इंडस्ट्रीला चंदनवूड म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडप्रमाणे दक्षिणेतही ड्रग्सबाबत मोठे खुलासे झाले आहेत. या हाय-फाय ड्रग्ज प्रकरणात बरीच मोठी नावे समोर आली आहे. काही पेडलर्सदेखील पकडले गेले आहेत. तसेच या प्रकरणात अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि संजना गल्रानी यांना अटक करण्यात आली होती.

सीसीबीच्या पथकाने ओबेरॉय कुटुंबीयांची केली चौकशी

अडीच तासाच्या तपासणीनंतर बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने म्हणजेच सीसीबीने विवेक ओबेरॉय यांचे जुहू येथील घर सोडले आहे. येथे सीसीबीची टीम आदित्य अल्वाला शोधण्यासाठी आली. सीसीबी संघात दोन निरीक्षक आणि एक महिला अधिकारी यांचा समावेश होता. दुपारी एकच्या सुमारास पोलिस कर्मचारी विवेकच्या घरी पोहोचले.

ओबेरॉय कुटुंब सध्या जुहूमध्ये दुसर्‍या ठिकाणी राहत आहे कारण त्यांच्या मूळ बंगल्याची सध्या दुरुस्ती सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आदित्य अल्वा संदर्भात ओबेरॉय कुटूंबाचीही चौकशी केली. अल्वा हा सँडलवुड ड्रग्स प्रकरणातील सहावा आरोपी आहे आणि 3 सप्टेंबरपासून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओबेरॉय कुटुंबातील घरात आदित्य अल्वा सापडला नाही. कुटुंबीयांची चौकशी करून अधिकारी परत गेले.