मला मत द्या, अन्यथा मी शाप देईन

साक्षी महाराज यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईल, असे भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. साक्षी महाराज वादग्रस्त विधानांसांठी प्रसिद्ध आहेत. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत.

उन्नाव मध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये साक्षी महाराज पुन्हा एकदा खासदार होण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी मतदान प्रचार सुरू केला आहे. ते म्हणाले, मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिले तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन, मात्र तुर्तास मी तुमच्याकडे मत मागतो आहे. तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरत आहे. निवडणूकीमध्ये मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईल, तुमच्या आयुष्यात असलेला आनंद मी हिरावून घेईन.

नरेंद्र मोदी यांची देशात सुनामी येणार आहे. मला वाटते २०२४ मध्ये निवडणुका होणार नाहीत. २०१४ मधील मोदींची लाट होती ती २०१९ मध्ये सुनामीमध्ये बदलली आहे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. काही जण प्रियंकाला राजकारणात घेऊन आले. तर काही जण गठबंधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जण म्हणत आहे मोदी आहेत तर देश आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर निवडणूक कोणत्याही पार्टीतील व्यक्तीच्या नावे नाहीतर देशाच्या नावे लढवली जाईल.

दरम्यान, साक्षी महाराज यांच्या वक्तव्यावर अद्याप भाजपने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. साक्षी महाराज यांच्या वक्तव्याचा आधार घेत विरोधकांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे.