राज्यातील ‘या’ 19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतीसाठी 29 मार्चला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील 19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच व सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज पासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी नामनिर्देशपत्र 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत शासकीय सुट्टी वगळून स्विकारली जाणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी 16 मार्च रोजी होणार आहे. तर 18 मार्च पर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. तसेच त्याच दिवशी संबंधित उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 30 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, गडचिरोली या जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी तीन अशी ठेवण्यात आली आहे.

जिल्हा आणि निवडणूक होणाऱ्या ग्रमपंचायतींची संख्या खालील प्रमाणे
ठाणे -13, रायगड – 1, रत्नागिरी -8, नाशिक – 102, जळगाव -2, अहमदनगर-2, नंदुरबार 38, पुणे-6, सातारा-2, कोल्हापूर-4, औरंगाबाद-7, नांदेड-100, अकोला-1, अमरावती-526, यवतमाळ-461, बुलडाणा – 1, नागपूर-1, वर्धा -3 गडचिरोली -296