युरोपसाठी प्रतिक्षा, आता लक्ष चेन्नईयीनवर : छांगटे

पोलीसनामा ऑनलाइन – लालीयनझुला छांगटे युरोपमध्ये नशीब आजमावून मायदेशी परतला आहे. देशातील सर्वाधिक प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. आता या तरुण खेळाडूने चेन्नईयीन एफसीला हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पुन्हा अव्वल स्थान मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. सहाव्या मोसमापूर्वी त्याने आयएसएलच्या प्रसार माध्यम प्रतिनीधीशी संवाद साधला.

जवळपास सर्वच क्लब तुझी स्वाक्षरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असताना तू चेन्नईयीन एफसीची निवड का केलीस ?

हा निर्णय माझ्यासाठी सर्वोत्तम ठरेल असे वाटले. इतर क्लबपेक्षा चेन्नईयीनने जास्त उत्सुकता दर्शविली. माझे असणे प्रेमळ ठरेल अशी भावना त्यांनी माझ्या मनात निर्माण केली. प्रशिक्षकांनी अगदी फोन करून मला भविष्यातील योजनांविषयी सांगितले. माझ्या प्रगतीमध्ये मदत करण्याची इच्छा त्यांनी दर्शविली. त्याबद्दल मी क्लबचा ऋणी आहे.

नॉर्वेतील व्हिकींग एफसीकडे तू दोन वेळा ट्रायल दिलीस. युरोपमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार करण्याच्या आघाडीवर पुढे काय हालचाल आहे ?

नॉर्वेमध्ये मला फार मोठा अनुभव मिळाला. आता माझे लक्ष चेन्नईयीएन एफसीवर आणि त्यांना आयएसएल विजेतेपद पुन्हा मिळवून देण्यावर केंद्रीत झाले आहे. एक खेळाडू म्हणून एकेदिवशी युरोपमध्ये खेळण्याची महत्त्वाकांक्षा मी अजूनही बाळगली आहे. या घडीला मात्र क्लब आणि देशासाठी कामगिरी करण्यावर आणि त्याकरीता ट्रेनींगवर लक्ष दिले आहे.

गेल्या मोसमात शेवटच्या स्थानावर फेकले गेल्यानंतर चेन्नईयीन एफसी यावेळी पुनरागमन करेल अशी आशा तुला कशामुळे वाटते ?

चेन्नईयीनने मागील वर्षी चांगली कामगिरी केली नाही, पण तो यापूर्वीच भूतकाळ झाला आहे. आमच्याकडे नव्या खेळाडूंची भर पडली आहे. संघाची स्थिती छान आहे. प्रशिक्षण दल फार विनम्र आहे. त्यांच्यासह काम करण्यास मला खूपच छान वाटते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे असे प्रशिक्षक आहेत, जे यापूर्वीच आयएसएल विजेते ठरले आहेत आणि क्लबला पुन्हा योग्यतेचे अव्वल स्थान मिळवून देण्यास प्रयत्नशील आहेत. आम्ही यंदा हेच करण्याच्या प्रयत्नात आहोत. हे साध्य करण्याइतकी गुणवत्ता संघात असल्याविषयी मला कोणतीही शंका नाही.

दिल्ली डायनॅमोजमधील अनुभवाचे वर्णन तू कसे करशील ?

या क्लबने माझ्या क्षमतेवर भरवसा ठेवला. ही एक मोठीच संधी ठरली. त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. सपोर्ट स्टाफमधील सर्व जण माझ्याशी फार चांगले वागायचे. त्यांनी मदत केली नसती तर मी आज जो आहे तसा खेळाडू बनू शकलो नसतो.

2015 मध्ये तू भारतासाठी पदार्पण केले तेव्हा तू फार तरुण होतास. गुणवत्ता बहरणार नाही अशी भिती तुला वाटली होती का

2015 मध्ये पदार्पणात गोल करण्याचा विलक्षण अनुभव मला लाभला. मग मी सॅफ विजेतेपदही जिकले. मग त्यानंतरच्या कालावधीत चढ-उतार आले, ज्यात सकारात्मक राहण्यास आणि कसून सराव सुरू ठेवण्यास मी शिकलो.

आता इगोर स्टीमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा अनुभव कसा आहे ?

इगोर हे एक महान प्रशिक्षक आहे. त्यांना खेळाडूंची क्षमता फार चांगली समजते. त्यांनी खेळाडूंमध्ये बरीच चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे प्रत्येक जण लक्ष केंद्रीत ठेवतो आणि संघातील स्थान कुणलाही विनासायास मिळत नाही. तुम्ही मैदानावर भक्कम ट्रेनींग केले तर तुम्ही किती जुने किंवा तरुण आहात यावर न ठरता तुम्ही खेळू शकता. आम्हा सर्वांकडून ते सर्वोत्तम कामगिरी करून घेत आहेत.

कतारविरुद्ध एक गुण मिळविणे संस्मरणीय ठरले असेल ना…

संघासाठी हा निकाल अप्रतिम ठरला, ज्यामुळे देशाला खूप आनंद लाभला. मी सांघिक खेळाडू आहे. त्यामुळे कुणीही खेळले तरी देशासाठी अपेक्षित निकाल मिळविण्यास प्राधानय असते. एक वैयक्तिक खेळाडू म्हणून मला सराव करायचा आणि रोज सुधारणा करायची आहे. कतारिरुद्धचा निकाल आणि कामगिरी प्रत्येकाचे मनोधैर्य उंचावण्यात मोलाची ठरली आहे. आता चांगली कामगिरी करीत राहण्यावर आणि बांगलादेशविरुद्ध जिंकण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

Visit : Policenama.com