मालेगावमध्ये वॉचमनचा सपासप वार करून निर्घृण खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव शहराजवळील मनमाड चौफुलीवर असलेल्या एका ढाब्याच्या वॉचमनचा (Watchman) चाकूने सपासप वार करून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.6) मध्यरात्री घडली आहे. घटनेच्या दिवशी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना ही खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कृष्णा चैत्राम सोनवणे (वय 65) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव असून, ते राजस्थान ढाबा येथे कामाला होते.

विशेष म्हणजे सोनवणे यांच्याजवळील मोबाईलसह किरकोळ रक्कमदेखील जैसे थे होती. तसेच नजीकच्या भागातदेखील चोरी व घरफोडीचा प्रकार झालेला नाही. त्यामुळे सोनवणे यांचा खून नेमका का झाला हे अद्याप समजू शकले नाही. मनमाड चौफुलीवरील खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व किल्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सकाळी श्वान पथकालाही पाचारण केले. पोलीस घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करून गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी परिसर पिंजून काढत आहे. दुपारपर्यंत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. शहरात खून व गुन्हेगारीच्या वाढत्या घटना चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत.

शहरात वाढली गुन्हेगारी
शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी रात्री महामार्गावर कापूस व्यापाऱ्याकडून 20 लाख लुटल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर रविवारी खुनाची दुसरी घटना घडली आहे. मागील महिन्यात दुचाकी व पशुधन चोरी, रस्तालुट, घरफोडी, अवैध शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गोळीबार, खून अशा विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, कारागृहातून सुटून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच त्याचे पोस्टर शहरात लावण्यात आले होते. शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत असून, यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.