नगर : उद्याही शहरात पाणीटंचाईचे संकट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जलवाहिनीच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याने शहरात उद्याही, रविवारी (दि. 5) पाणीटंचाईचे संकट ओढविले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीबचत करावी, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

नगर-मनमाड रोडलगत धामोरी फाटा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे. आज सकाळी 11 वाजता हजर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामास विलंब होणार असून याकामासाठी महावितरणकडून शटडाऊन घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेत पाणी वितरणाच्या टाक्या भरणे शक्य होणार नाही. परिणामी, रविवारी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, काळूबागवान गल्ली, झेंडीगेट, दाळमंडई, धरती चौक, माळीवाडा, कोठी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, तसेच गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको या भागात पाणीपुरवठा होणार नाही. या भागात रविवार ऐवजी सोमवारी पाणी सोडण्यात येणार आहे.

सोमवारी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, कापड बाजार, माळीवाडा आदी भागात पाणी सोडण्यात येणार नाही. या भागाला सोमवार ऐवजी मंगळवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.