‘धर्म’ आणि ‘राजकारण’ एकत्र केल्याचे ‘फटके’ आम्हाला पडले, उद्धव ठाकरेंची मोठी कबुली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी माणूस आणि हिंदुत्व हे शिवसेनेच्या राजकारणाचा प्राण आहे. गेली पाच दशकं याच हिंदुत्वाच्या राजकारणाने शिवसेनेने महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात वादळ निर्माण केले. ज्वलंत हिंदुत्वाचा ऐकमेव पक्ष अशी शिवसेनेची ओळखही निर्माण झाली. मात्र, मागील महिन्याभरात परिस्थिती बदलली आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. त्यावरून शिवसेनेला मोठी टीकाही सहन करावी लागली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी कबुली दिली आहे. राजकारण हा जुगार असून तो जुगारासारखाच खेळावा लागतो. त्याची गल्लत केली की गडबड होते. राजकारण आणि धर्म यांची आम्ही सरमिसळ केली आणि त्याचे फटके आम्हाला पडले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कबुलीने शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट होत असल्याचे म्हटले जातंय. शिवसेना आपल्या हिदुत्वाला ऐकमेव तारणार मानत असताना ठाकरेंनी अशी कबुली देणे महत्त्वाचे मानले जातेय.

मंत्रीमंडळ विस्तार लांबणार ?
हिवाळी अधिवेशन संपायला आले असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होणार कधी असा प्रश्न आमदारांना पडू लागला आहे. यावर विचार करण्यासाठी आज नागपूरमध्ये बैठकही झाली. गेली दोन दिवस नागपुरात मुक्कामी असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बैठक झाली. बैठकिनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ठोस उत्तर दिलं नाही. ठरलं की सांगतो असे उद्धव ठाकरे म्हणाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणार तर नाही ना? अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/