‘चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही’, निलेश राणेंचा मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. हे वर्ष शाह काटशाहच्या राजकारणामुळे चांगलेच गाजले. वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असं लिहिण्यात आले आहे. त्यावर भाजप नेते नीलेश राणे यांनी चंगू मंगूच्या फालतू गप्पा बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही, असं ट्विट करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत याना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना संजय राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. त्यामुळे या मुलाखतीत काय असणार, याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

नीलेश राणे यांनी मात्र या मुलाखतीवरून शिवसेनेवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधत ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगूच्या फालतू गप्पा, असं म्हंटले आहे.

मुलाखतीची उत्सुकता शिगेला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षपूर्ती कामाचा अहवाल लोकांपुढे लवकरच ठेवला जाईल, असे दसरा मेळाव्यात सांगितले होते. तो अहवाल याच मुलाखतीतून मुख्यमंत्री मांडणार तर नाहीत ना, अशी उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपने टीका केली होती, तर नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजप नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे.