सरकार मी चालवतो, ‘सामना’ नाही : मुख्यमंत्री

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारचे काही चुकले की सामनाच्या अग्रलेखांमधून टीका करण्यात येते. एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली जाते. मात्र सामना सरकार चालवत नाही, मी चालवतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले आहे. सरकारमध्ये राहुन भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी झापल्याने आता शिवसेना यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सतत राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही जहाल टीका केली जात असल्याने मुख्मंत्र्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, गेल्या चार वर्षात महाराष्ट्रानं अपेक्षित प्रगती केली आहे आणि पुढच्या टर्मलाही मीच मुख्यमंत्री असेन. २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री होईन आणि शिवसेना मलाच पाठिंबा देईल.

ADV

नाणार प्रकल्पावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, नाणारमुळे राज्याचे भलेच होणार आहे. ही वेस्ट कोस्ट रिफायनरी आहे. नाणार प्रकल्प नेमका काय आहे हे समजून न घेता त्याला विरोध केला जातो आहे. शिवस्मारकाच्या विषयावर मुख्यमंत्री म्हणाले, शिवस्मारक आम्हीच बांधणार त्याची जागा बदलणे आता चुकीचे ठरेल. जागा निश्चिती आघाडी सरकारच्या काळात झाली मात्र स्मारकाला आम्ही पूर्णत्त्व देऊ. मराठा आरक्षणाबाबतही ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत नोव्हेंबर अखेर पर्यंत मागास आयोगाला अहवाल दिला जाईल यासाठी आम्ही सर्व पक्षांचे सहकार्य घेतो आहोत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांचं योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. जलयुक्त शिवार आणि भूगर्भ पातळी यावरून विरोधक बुद्धीभेद करत आहेत.