‘बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे ?’ : संजय राऊतांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama ) यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे म्हटले आहे. ओबामांनी राहुल गांधीबद्दल व्यक्त केलेल्या मुद्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (sanjay-raut ) बराक ओबामा यांच्यावर टीका केली आहे. परदेशातील एखादा राजकारणी भारतातील राजकीय नेत्यांबद्दल अशी मते व्यक्त करू शकत नाहीत. ट्रम्प वेडे आहेत असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे ? असा सवालही राऊत यांनी केला.

काय लिहलंय पुस्तकात
राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत, ज्यानं अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नसल्याचे ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहेत. ज्या विद्यार्थ्याने आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे; परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नसल्याचे म्हटले आहे.