फक्त माऊथ फ्रेशनर म्हणून नव्हे तर वजन कमी करण्यासह ‘या’ 5 समस्यांवरही फायदेशीर ठरते ‘बडीशेप’ !

पोलीसनामा ऑनलाइन – आपण सारेच बडीशेप खातो. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, सोडियम, लोह, पोटॅशियम अशी मूलद्रव्ये असतात. म्हणून बडीशेपचा वापर औषधाच्या रूपात केला जातो. तसं पाहिलं तर बडीशेप हे एक आयुर्वेदीक औषध आहे. किचनमध्ये इतर मसाल्यांसोबत बडीशेप हमखास ठेवली जाते. काहीजण जेवणांतर तोंडाचा दुर्गंध येऊ नये यासाठी बडीशेपचं सेवन करतात. परंतु बडीशेप फक्त माऊथ फ्रेशनर म्हणूनच नाही तर शरीराच्या अनेक समस्यांवर उपचार करत असते. याचा आरोग्यासाठी काय फायदा होतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) वजन कमी करण्याचा सोपा उपाय – बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामळं पोट भरल्यासारखं वाटतं. यात जास्त कॅलरीजही नसतात. यामुळं वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. बडीशेप शरीरात चरबी साठू देत नाही. जर तुम्ही बडीशेपचा चहा पिला तर यामुळं शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात. जर बडीशेपच्या बिया खाल्ल्या तर चयापचय मजबूत होण्यास मदत होते. जर चयापचय मजबूत राहिलं तर वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

2) बद्धकोष्ठता दूर होते – डॉक्टर सांगतात की, बडीशेपमध्ये तंतूमय पदार्थांमुळं शरीरातील पचनक्रिया चांगली राहते. यामुळं बद्धकोष्ठता दूर होते. जर नियमित याचं सेवन केलं तर वात आणि पित्ताची समस्या होत नाही. ज्यांना कायमच अपचन आणि बद्धकोष्ठता अशा समस्या येतात त्यांनी नियमित बडीशेपचं चूर्ण खायला हवं. बडीशेप आणि साखर यांचं चूर्ण बनवावं. 5 ग्रॅम चूर्ण कोमट पाण्यात टाकून रात्री झोपताना घ्यावं. हा उपाय जर रोज केला तर पोट साफ होईल आणि यकृत स्वस्थ राहिल.

लहान मुलांसाठी तर याचा खूप फायदा होतो. लहान मुलांना जर पचनाची समस्या झाली असेल तर दोन चमचे बडीशेपचे चूर्ण दोन कप पाण्यात एक चतुर्थांश राहिल इतकं उकळून घ्या. त्यांतर ते थंड करून गाळून घ्या. हे पाणी दिवसातून 2-3 चमचे दिवसातून 2-3 वेळा मुलांना प्यायला द्या. यामुळं त्यांची पोटाच्या समस्या दूर होतात.

3) नजर चांगली राहते – बडीशेपच्या सेवनामुळं तुमची नजरही चांगली राहते. जेवणानंतर 1 चमचा बडीशेप खाल्ली किंवा रात्री झोपताना अर्धा चमचा बडीशेपचं चूर्ण 1 चमचा साखर घेऊन दूध किंवा पाण्यात घेतलं तर यामुळं डोळे चांगले राहतात.

4) स्मरणशक्ती वाढते – डॉक्टर सांगतात की, स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही बडीशेपचा खूप फायदा होतो. यासाठी तुम्हाला बडीशेप आणि साखरेचं चूर्ण बनवू घ्यावं लागेल. जर सकाळी आणि रात्री 2-2 चमचे याचं सेवन केलं तर यामुळं स्मरणशक्ती वाढते.

5) खोकला दूर होतो – जर तुम्हाला जास्त खोकला येत असेल तर बडीशेप आणि लवंग खाणं जास्त फायदेशीर ठरतं. बडीशेपचा 10 ग्रॅम रस मधात मिसळून दिवसातून 2-3 वेळा जर याचं सेवन केलं तर खोकलाही बरा होतो. जर याचा काढा बनवायचा असेल तर 1 चमचा बडीशेप, 2 चमचे ओवा, एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. आता याला गाळून घ्या आणि त्यात मध टाका. यानंतर तुम्ही याचं सेवन करू शकता. यामुळंही तुमचा खोकला दूर होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.