टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत

मुंबई : ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत गावस्कर – बॉर्डर ट्रॉफी भारताकडेच ठेवणार्‍या टीम इंडियाचे आज पहाटे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

९ प्रमुख खेळाडु जायबंदी असताना नवोदित खेळाडुंना घेऊन अजिंक्य रहाणे यांच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर गाबा मैदानावर विजय मिळवून ७० वर्षाचा विक्रम मोडला. त्यामुळे टीम इंडियाचे संपूर्ण देशाभराबरोबर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑस्ट्रेलियाहून दुबईमार्गे टीम इंडियातील खेळाडुंचे आज पहाटे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसह खेळाडु बाहेर आल्यानंतर चाहत्यांनी जल्लोष करीत त्यांचे अभिनंदन केले. या खेळाडुंना कोठे क्वारंटाईन करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.