‘कोरोना’पासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा ‘या’ भाजपा खासदाराचा सल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम ‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’ असे धक्कादायक वक्तव्य पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. गोमूत्राची माहिती देताना त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्याने शरीराची विषाणूसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असेही म्हटले आहे.

घोष यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये खासदार घोष एका बैठकीत असून तेथे ते घरगुती गोष्टींचा आरोग्यसाठी वापर समजावून सांगत आहे. गोमूत्र पिल्याने लोकांचे आरोग्य सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, असा दावा केला आहे. ‘मी जर गायीबद्दल बोलायला लागलो तर अनेक जणांना ते पटणार नाही ते असहज होतील. गाढवे कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. आपण गायीची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणे आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचे महत्त्व कसे काय लक्षात येईल.’