१ एप्रिलपासून ‘या’ आर्थिक बाबतीत होणार मोठे बदल

पहा काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – येत्या १ एप्रिलपासून जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. रोजच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या बाबींवर याचा परिणाम होणार आहे. १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या नव्या आर्थिक वर्षात नेमके काय महाग होणार आणि काय स्वस्त होणार यावर एक नजर टाकूया.

कोणत्या गोष्टी स्वस्त होणार

१) घर खरेदी करणं होणार स्वस्त

१ एप्रिल २०२९ पासून घर खरेदी करणं स्वस्त होणार. जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधिन दुकानांवरील टॅक्स स्लॅब १२ वरुन ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी ८ वरुन १ टक्के केला आहे. सीमेंट वगळता बाकी वस्तुंवरील जीएसटी स्लॅब कमी केला आहे. घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.

२) जीवन विमा स्वस्त होणार

जीवन विमा स्वस्त होणार. जीएसटीच्या नव्या नियमांचं विमा कंपन्यांना पालन करावं लागणार आहे. आतापर्यंत विमा कंपन्या २००६-०८ चा डेटा वापरत होते. मात्र, १ एप्रिलपासून विमा कंपन्यांना नव्या डेटाचा आधार घ्यावा लागणार आहे. जो २०१२-२०१४ साली तयार करण्यात आला होता.

३) ट्रेन बुकिंग रिफंड होणार

जर तुम्ही रेल्वेचं तिकीट काढलं असेल आणि तुमची काही कारणांनी ट्रेन चुकली तर तुमचं तिकीट तुम्हाला रिफंड मिळू शकतं. किंवा तुम्ही दुसरं तिकीट काढून दोन पीएनआर एकत्र लिंक करु शकता. दोन तिकीटांसाठी संयुक्त पीएनआर नंबर दिला जाईल. ज्यामध्ये एक ट्रेन सुटली तर दुसऱ्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकता.

४) ईपीएफओ ट्रान्सफर करणं सोपं होणार

नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ईपीएफओसाठी अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार

५) बँकेतून लोन घेणं स्वस्त होणार

१ एप्रिलपासून बँकेत लोन घेणं स्वस्त होणार आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याजदरातही कपात होणार आहे. व्याजदर वाढवणं किंवा कमी करणं आता बँकेच्या हातात राहणार नाही. बँकेच्या व्याजदरांवर रिझर्व्ह बँकेची नजर राहणार आहे.

काय महाग होणार

१) कार खरेदी करणं होणार महाग 

कार खरेदी करणं महाग होणार आहे. टाटा मोटर्स, रेनॉल्ट इंडिया, जगुआर लैंड रोवर इंडिया (जेएलआर), महिंद्रा एंड महिंद्रा, टोयोटा मोटर्स कार बनवणाऱ्या वस्तुंवरील किंमतीत वाढ करणार आहेत. १ एप्रिलपासून कारचे पार्ट महाग झाल्यानं कारची किंमत वाढणार आहे. त्यामुळे कार खरेदीत तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

२) गाडी चालवणं होणार महाग

सीएनजी गॅसच्या किंमती १८ टक्क्यांनी वाढल्यामुळे तुमच्या खिसा लवकर रिकामा होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसोबत आता सीएनजी गॅसची किंमतही वाढणार आहे.

३) घरगुती गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता

१ एप्रिलपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व सोसायटी अथवा कॉम्प्लेक्समधील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.