अशी टाळू शकता गॉल ब्लैडर स्टोनची समस्या

पोलीसनामा ऑनलाइन –गॉल ब्लैडर स्टोन म्हणजे पित्ताशयात होणारे खडे होय. ही समस्या खुपच त्रासदायक असते. परंतु, तिचे निदान वेळीच होऊ शकते. तसेच ही समस्या का होते, कुणाला होते, याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. काही काळजी घेतली तर ही समस्या आपण टाळू शकतो.

जेवणात तेल-तुप योग्य प्रमाण वापरावे. फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप चालू शकते. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा. तळलेले पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळावे. जेवणात कोशिंबीर, सॅलड घ्यावे. चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत. तसेच आपण नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. महिलांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होतात.

अलिकडे हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येतात. यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) पित्तरसाची निर्मिती होते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय असते. शरीरात जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्त नलिकेवाटे लहान आतड्यात सोडणे हे पित्ताशयाचे काम असते. आपण जे अन्न खातो त्याच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. जेवणात तेलकट तसेच फायबर पदार्थाचं प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात.

कधी कधी द्रव्यामध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉल किंवा बाइलमुळे गॉल ब्लैडरमध्ये खडे तयार होतात. हे खडे मटारच्या दाण्यांपासून ते गोल्फ बॉलच्या आकाराचेही असतात. जास्तीत जास्त गॉल ब्लैडर स्टोन कोणतेही लक्षण किंवा नुकसान न पोहोचवता गॉल ब्लैडरमध्ये पडलेले असतात. कधी कधी व्यक्तीला आयुष्यभर हे माहीत नसते पण कधी काही कारणाने सोनोग्राफी केली तर याची माहिती मिळते. याची काही लक्षणे दिसली नाही तर यावर उपचारही फार गरजेचे नसतात. पण लक्षणे दिसली तर वेळीच उपचार करावे लागतात. गॉल ब्लॅडर काढून टाकणे हाच उपाय आहे.

गॉल ब्लैडरमुळे पोटात जोरात वेदना होऊ शकतात. गॉल ब्लैडरमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. यावर उपचार न करणे हे धोकादायक ठरू शकतं. सुरुवातीची लक्षणे अ‍ॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते. त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.