राज्य सरकारनं जाहीर केली लॉकडाऊन 5.0 ची नियमावली, सांगितलं काय चालू अन् काय बंद, जाणून ध्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 लागू केला असून केंद्राकडून त्याबाबत नियमावली शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज (रविवार) महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबात नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये 3 टप्पे करण्यात आले आहेत. राज्यात काय चालू आणि काय बंद असणार आहे याचा तक्ताच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक दिवसांपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवणं शक्य नसल्याने लॉकडाऊन 5.0 मध्ये काही अटी आणि शर्तींवर सुट देण्यात आली आहे. राज्य सरकारनं काय चालू आणि काय बंद याबाबतचा तक्ता जाहीर केला आहे.

पहिला टप्पा : 3 जून पासून – यामध्ये पहाटे 5 ते सायंकाळी 7 दरम्यान वैयक्तिरित्या सायकलिंग, जॉगिंग, रनिंग करता येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्रीडांगणावर या गोष्टी करता येणार आहेत.

दुसरा टप्पा : 5 जून पासून – मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सोडून इतर बाजारपेठा उघडल्या जाणार असून त्या काही अटी व शर्तींवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान चालू राहणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं पी-1 आणि पी-2 चं नियोजन केलं आहे. दरम्यान, 5 जून पासून नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आणि दुचाकींचा वापर करण्यासाठी काही अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये चालक आणि 2 व्यक्ती, रिक्षामध्ये चालक आणि दोन व्यक्ती, चारचाकीमध्ये चालक आणि 2 व्यक्ती तर दुचाकीवर केवळ एकानेच प्रवास करावा असे सांगण्यात आले आहे

तिसरा टप्पा : 8 जून पासून – सर्व खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे मात्र कर्मचार्‍यांची संख्या केवळ 10 टक्के ठेवावी असे देखील सांगण्यात आले आहे. त्यासाठी देखील काही अटी सरकारनं घातल्या आहेत. दरम्यान, या टप्प्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकीवर एकजण प्रवास करू शकणार आहे तर तीन चाकी मध्ये चालक आणि इतर 2 व्यक्ती आणि चारचाकीमध्ये देखील चालक आणि इतर दोन व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.

हे प्रतिबंधित (बंदच) असणार – शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग हे पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच. सामाजिक, राजकीय, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंदच. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स बंदच. पुढील आदेशापर्यंत या सर्व गोष्टी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.