WhatsApp वर फॉरवर्ड केलेला मेसेज खरा आहे की ‘फेक’, ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर दररोज बरेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस येत असतात. यापैकी बरेच मेसेज खरे असतात आणि बरेच फेक असतात. परंतु यापैकी कोणता मेसेज खरा आहे आणि कोणता फेक आहे हे शोधणे फार कठीण आहे. ही अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आता एक नवीन फीचर समोर आले आहे जे तुम्हाला फॉरवर्ड मेसेजेसच्या वास्तविकतेविषयी सांगेल. तथापि, हे वैशिष्ट्य सध्या भारतात उपलब्ध नाही, परंतु लवकरच ते भारतासाठी जारी केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

असे तपासा फेक मेसेज
व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, या वैशिष्ट्याद्वारे बर्‍याच वेळा फॉरवर्ड केलेला मेसेज सहज तपासता येतो. यामुळे युजर्सला त्यांच्याकडे आलेला संदेश योग्य आहे की नाही हे जाणून घेण्याची संधी मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या खास वैशिष्ट्याद्वारे, यूजर्स फॉरवर्ड केलेल्या मेसेजच्या जवळ दिलेल्या मॅग्निफाइंग ग्लास आयकॉनवर टॅप करून ब्राउझरवर पोहोचतील, जिथून हा मेसेज अपलोड केला गेला आहे.

हे वैशिष्ट्य या देशांमध्ये उपलब्ध आहे
व्हॉट्सअ‍ॅपचे हे वैशिष्ट्य सध्या ब्राझील, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएसएसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर लवकरच हे वैशिष्ट्य भारतात येण्याचीही अपेक्षा आहे. हे वैशिष्ट्य अँड्रॉइड, आयओएससह व्हॉट्सॲप वेबवर देखील आणले गेले आहे. यासाठी युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपची लेटेस्ट वर्जन डाऊनलोड करावे लागेल.