नौदल अधिकार्‍यास मारहाण : शिवसेनेला घेरणार्‍या भाजपला काँग्रेसनं ‘असं’ पकडलं कोंडीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. आता या प्रकरणात काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उडी घेतली आहे. सचिन सावंत यांनी भाजप आमदार आणि आताचे खासदार उन्मेष पाटील यांच्या सांगण्यावरुन एका सैनिकावर तलवारीने वार केला होता. या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे.

भाजपला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खरंच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षापासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर 2016 साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही तेव्हा फडणवीस सरकारने घेतली नाही. तीन वर्षे एफआयआरही दाखल केला नाही. मुंबईतील प्रकरणात निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजप सोनू महाजनांना कधी न्याय मिळवून देणार, असा परखड सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

जळगावमधील माजी सैनिक सोनु महाजन यांच्यावर 2016 मध्ये भाजपचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरुन हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीसांचे सरकार होते. तेच गृहमंत्री होते तरीही एफआयआर देखील दाखल करुन घेतली नाही. उच्च न्यायालयाने 2019 मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह किंवा त्यांच्या आधिच्या संरक्षण मंत्र्यांनेही याची दखल घेतली नाही. राजनाथ सिंह सोनु महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन फोन करणार आहेत का ? सैनिका-सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा ? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तात्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही याचे उत्तर भाजपने द्यावे असे सावंत यांनी म्हटले आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिक सोनू महाजन प्रकरणाचा पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.