‘हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार ?’ काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कराची स्वीट्स (Karachi Sweet ) या नावामुळे देशातील सैनिकांचा अपमान होत असल्याचे सांगत शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी केली होती. त्यासाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका कॉंग्रेस नेत्यांनीही बोचरी टीका केली आहे.

यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम ( Sanjay Nirupam) यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारतात चायनीज हॉटेलचे चीनशी काही देणे- घेणे नाही. तसेच वांद्रे येथील कराची स्वीट्सच पाकिस्तानशी कोणतेही नाते नाही. हे सत्य शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? 70 वर्षे जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जात असेल, तर हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांचे रक्षण करावे असे म्हटले आहे.

… ही शिवसेनेची भूमिका नाही : खा. राऊत
कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल अशी नावे मुंबईत चालणार नाहीत. पंधरा दिवसांत कराची नाव असलेल्या पाट्या बदला, असा इशारा शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी दुकानदारांना दिला होता. त्यावरून राजकीय घमासान सुरू झालेले असतानाच कराची नाव बदला, ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या 60 वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात अर्थ नाही असे त्यांनी म्हटले आहे.