‘सुशांत प्रकरणात कोणत्या नेत्याला वाचवायचं आहे ?’, भाजपकडून ठाकरे सरकारला सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू हे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वैद्यकीय मंडळाने काढला आहे. त्यावरुन सत्ताधारी मंडळींनी भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावर आता भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विट करत राम कदम म्हणाले, ‘सामनाकर शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि त्याच्या कुटूंबाला बदनाम आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय ? ७४ वर्षाच्या म्हाताऱ्या सुशांतच्या वडिलांना आणि कुटूंबीयांना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं. देवाघरी गेलेल्या सुशांतला देखील मेल्यानंतर शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. अत्यंत वाईट शब्दांत अपमानित करतात, मृत्यूनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हा हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामानाकर राजकारणाच्या स्वार्थपोटी विसरले,’ असा टोला अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना कदम यांनी लगावला.

तसेच ‘सामनाकर स्वार्थापोटी विसरले दुर्दैव सीबीआय तपास अजून पूर्ण झाला नाही. त्याच्या आधीच आत्मसाक्षात्कार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेते सुशांत सिंह राजपूत बाबतीत चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निष्कर्षापर्यंत येतात याच आश्चर्य कमी पण त्यांना कुणाला वाचवायचं आहे ? हा प्रश्न अधिक पडतो, अशा शब्दांत राम कदम यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहलं होत पत्र

सुशांत सिंह प्रकरणावरुन राम कदम यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहलं होते. त्यात त्यांनी म्हटलं की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे ६५ दिवस होता. तेव्हा महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमधील ड्रग्ज संबंधित गंभीर व्हॉट्सअप चॅट कडे दुर्लक्ष का केलं. तिला अटक करण्यात का आली नाही. या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याचा कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही, अशी कोट्यवधी जनतेची मानसिकता आहे. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ता म्हणून सरकारचे काही नेते आणि सरकार वागत असल्याचा, टोला राम कदम यांनी या पत्रात लगावला आहे.