ग्रामपंचायत निवडणूक निकाल : राज्यात सर्वात मोठा पक्ष कोणता ? कोणाची ‘सरशी’, कोणाला ‘धक्का’ ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 18) जाहीर झाले. मात्र, कोणाच्या पारड्यात किती ग्राम पंचायती याचा आकडा मंगळवारी (दि..19) जवळपास स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यस्तरावर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या आहेत. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले.

राज्यात अनेक ठिकाणी निवडणुकीत काटें की टक्कर पाहयला मिळाली. बहुतांश ठिकाणी आमदार-खासदारांनी आपापली गावे राखली. तर काही गावात मात्र नेत्यांना मतदारांनी अनपेक्षितपणे गावक-यांनी धूळ चारली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवली जात नाही पण लोकप्रतिनिधी, मोठे नेते आपले पॅनेल उभे करतात. त्यामुळे विजय, पराजय हा त्या त्या आमदार किंवा पॅनलचा असतो. परंतू नंतर जेव्हा गोळाबेरीज केली जाते तेंव्हा पक्षाचा विचार केला जातो. त्यानुसार शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने 3113 ग्राम पंचायतींवर भगवा फडकविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपा आहे. भाजपाने 2632 ग्राम पंचायतींवर विजय मिळविला आहे. यानंतर राज्यात सत्तास्थापनेत आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. राष्ट्रवादीच्या पारड्यात 2400 ग्राम पंचायती ताब्यात आल्या आहेत. काँग्रेसने पहिल्या क्रमांकाचा दावा केला असला तरीही त्यांच्या पारड्यात 1823 ग्राम पंचायती आल्या आहेत. तर राज ठाकरेंच्या मनसेला 36 ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांना 2344 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत.

तर दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती हे पाहणे देखील औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना 520 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे 278 तर भाजपाकडे 257 ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे 218 ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे 124 ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे 5 ग्राम पंचायती आहेत.

विजयी उमेदवाराचे लक्ष सरपंच सोडतीकडे
आता विजयी उमेदवारांचे सर्व लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आता सरपंच कोणाचा आणि कोणत्या पक्षाचा होणार हे येणार काळ ठरवेल. दरम्यान निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.