CAA : दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आणल्यापासून देशात सर्वत्र त्याचा विरोध होताना दिसत आहे. विरोधात आणि कायद्याला पाठिंबा देणारे असे दोन्ही प्रकारचे मोर्चे निघताना दिसत आहेत.

दिल्लीत या कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात जमावातील एका तरुणाने पोलिसांवर गोळीबार केला होता, त्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, शाहरुख असे त्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार ईशान्य दिल्लीत घडला असून , या बद्दलचा एक व्हिडियो देखील समोर आला आहे. या व्हिडियोमध्ये तो तरुण बंदूक हातात धरून पोलीस कर्मचाऱ्याकडे धावत येताना दिसत आहे.

दिल्ली मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात ७० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले असून पोलीस हवालदारासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या व्हिडियो नुसार तरुणाने जाफराबाद मध्ये गोळीबार केला. त्या भागात जोरदार दगडफेक सुद्धा होत होती, यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण तणावपूर्ण वातावरण लक्षात घेत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हिंसाचाराची वाढती दाहकता पाहून पोलिसांनी या भागांत संचारबंदी म्हणजे कलम १४४ लागू केले असून , या भागात ४ किंवा ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व दिल्लीत मौजपूर, कर्दमपुरी, चांद बाग आणि दयालपूर या भागात हिंसाचार व जाळपोळीच्या काही घटना घडल्या आहेत. काल पासून या ठिकाणी दगडफेक सुरु असून, ब्रम्हपुरी आणि मौजपूर येथे दोन गटांत दगडफेक करण्यात आली आहे.

आज सर्व शाळांना सुट्टी , परीक्षाही रद्द
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ह्यांनी ह्या कायद्याला होणारा विरोध आणि ईशान्य पूर्व भागात झालेला हिंसाचार पाहता सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आणि कोणत्याही वर्गाची परीक्षा न घेण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली हिंसाचाराविरुद्ध मुंबईत निदर्शने
दिल्लीत चालू असणाऱ्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईत सुद्धा उमटले. काही लोक मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात शांततामय पद्धतीने आंदोलनाला बसलेले होते. मुंबई पोलीस डीसीपी संग्राम सिंह निशानदर यांच्या मते आंदोलनाची जागा आझाद मैदान आहे. तरीही काही आंदोलनकर्ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊ लागल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलनकर्ते मरीन ड्राईव्हकडे जाऊ लागले , म्हणून पोलिसांनी २० ते २५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.