हिंदू हिंसक नसते, तर रामायण-महाभारत घडलं नसतं : सीताराम येचुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘संघाचे स्वयंसेवक महाभारत रामायण यासारख्या ग्रंथांचे उदाहरण देतात आणि सांगतात हिंदू हिंसक नाहीत. विशेष धर्माची लोकंच हिंसा करतात का ? हिंदू हिंसा करीत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारताच्या ग्रंथांचा हवाला देत हिंदू हिंसक असल्याचं म्हटलं आहे. भोपाळ येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यांच्या या वक्तव्यावरून मात्र नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.

भाजपानं संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं…
यावेळी पुढे बोलताना येचुरी म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची ‘खासगी आर्मी’ तयार करत आहे. मात्र विरोधकांचं गठबंधन मोदींना सत्तेतून पायउतार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमादरम्यान भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्वीजय सिंह देखील उपस्थित होते. ते म्हणाले, ‘ही सामान्य लोकसभेची निवडणूक नव्हे, तर संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजपानं संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नाही. ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचंही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान भोपाळ मतदार संघाची देशभर चर्चा सुरु आहे कारण या मतदार संघात एकीकडे भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे अनुभवी नेते दिग्विजय सिंह निवडणुकीच्या मैदानात आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आल्या आहेत. शाहिद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान भोपाळ मतदार संघात ६ मे ला मतदान होणार आहे.