क्रश सँड प्रकरणात कोण लागणार गळाला ? पोलिसांशी संबंधित तपासाला पोलिस योग्य न्याय देणार का ? शिरुर तालुक्यात जोरदार चर्चा

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यात सध्या गाजत असलेल्या महसूलच्या वाळू प्रकरणाबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील क्रश सँड प्रकरणात महसूल विभागाने तपासाला गती घेतली तर पोलिस प्रशासनाकडून याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्याकडून तपास सुरु आहे. आता दोन्ही खात्याकडून चौकशी होणार आणि या प्रकरणात तथ्य असल्याने कुणाचा ना कुणाचा बळी जाणार हे मात्र नक्की.मात्र यामध्ये अधिकारी सापडणार की कर्मचारी सापडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण उघडकीस येऊन काही दिवस उलटल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस चौकशीसाठी जागृत झाले त्याबद्दल आत्ता पुणे ग्रामीण पोलीसांचे नागरिकांकडून उपहासात्मक कौतुक होत आहे . 22 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या एका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या निमित्ताने हे प्रकरण पुढे आले मात्र हे पुढे इतके रंजक होत गेले की वाळू चोरीची प्रकरणे हाताळण्यात सराईत झालेल्या पोलिस,महसूल अधिकारी कर्मचारी यांनी सरळ-सरळ दोन्ही खात्याची इज्जत वेशीवर टांगली आहे.

सुरवातीला पोलिस स्टेशनच्या आवारात वाळूच्या वर क्रश सँड टाकण्याचा प्रताप,तर महसुलकडून पाच ब्रास कमी पंचनामा, पुढे वाळूवर क्रश सँड टाकत थेट न्यायालयात गुमराह करण्याचे कारस्थान केले.एवढे करूनही न थांबलेल्या दोन्ही खात्यांकडून अजून या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे वक्तव्य दोन्ही जिल्हा प्रशासनाला शोभणारे नाही. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी पहिला पंचनाम्याच्या पर्दाफाश करून दुसरा पंचनामा होऊन पाच ब्रासची कागदोपत्री वाळू चोरी उघड झाली.यामध्ये आता केवळ पंचनामा करणारे कर्मचारी बळी जाणार हे तूर्तास तरी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.मात्र काही दिवसानंतर या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू केलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांकडूनही या प्रकरणात दोष कोणत्या एका किंवा दोन कर्मचाऱ्यांवर शेकविला जाणार हे मात्र नक्की. या प्रकरणात अधिकारी सांगतील असेच पोलिस कर्मचारी वागल्याने हे घडल्याचे शिक्रापूर पोलिस ठाण्यातील काही अधिकारी,कर्मचारी तर निवृत्त झालेले कर्मचारी खासगी मध्ये सांगत आहेत.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आता नेमकी कोणावर कारवाई करणार याची उत्सुकता सर्व शिरूर तालुक्यातील जनतेला लागून राहिली आहे. सध्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जाईल.त्यातील व्यक्तीचा शोध ही लावला जाईल मात्र या कृतीचा ” मास्टर माईंड “नेमका कोण ? तो या चौकशीत उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना सापडनार का? आणि तो सापडला तर त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील काय कारवाई करतील या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . तरच पोलिसांशी संबंधित तपासाला पोलिसांनी योग्य न्याय दिला असे म्हणता येईल व पोलिसांवरील जनतेचा विश्वास कायम राहील.माञ सध्यातरी हे प्रकरण इथेच थांबेल असे तूर्तास तरी वाटत नाही.