‘कोरोना’ चाचणीनंतरच शिक्षकांना एंट्री; शाळांचा सॅनिटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटरचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: पोलिसनामा ऑनलाइन – राज्यातील शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. यामुळे २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहे. तत्पूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसा आदेशही शिक्षण विभागाने काढला आहे. मात्र, शाळांना सॅनिटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटर कोण देणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षकांची १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आरटीपीसीआर (RTPCR) म्हणजेच कोरोना चाचणी करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. चाचणी केल्यानंतरच शिक्षक व शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहता येईल. तत्पूर्वी त्यांना चाचणीचा अहवाल शाळेला सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यान, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी शिक्षकांच्या सुरक्षेसंदर्भात आर्थिक व वैद्यकीय पुढाकार शासनाने घ्यायला हवा होता, अशी भूमिका घेतली आहे. तर या चाचण्या कुठे करायच्या? त्यासाठी शिक्षकांनी कुठे धावपळ करायची, असे अनेक प्रश्न शिक्षक विचारत आहेत. त्यापेक्षा शिक्षण विभागाने शाळांजवळच चाचण्यांची केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यासंदर्भात स्पष्ट निर्देश नसल्यामुळे शिक्षक व शाळा प्रशासनात संभ्रम आहे. शाळांना सॅनिटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटर कोण देणार हादेखील प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे शालेय व्यवस्थापनावर जबाबदारी टाकून शासन मोकळे झाले आहे. त्यामुळे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.