राजीनामा ज्योतिरादित्य शिंदेंचा पण ‘ट्रेन्डिंग’वर सचिन पायलट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्येप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचे समजताच सोशल मीडियावर देखील या मोठ्या राजकीय घडामोडीची चांगलीच चर्चा सुरु आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. आजच्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे देखील काँग्रेसला राजीनामा देणार का याबाबत सोशल मीडियावर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत एवढेच नाही तर सचिन पायलट हे ट्विटरवर ट्रेंडिंगवर देखील आहेत.

दुसरीकडे, सचिन पायलट यांनी मात्र मध्य प्रदेशचा राजकीय पेच लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त केलीय. ‘मला आशा आहे की मध्यप्रदेशवर घोंघावणारं राजकीय संकट लवकरच संपुष्टात येईल. सर्व नेते मतभेदांना दूर सारण्यात यशस्वी होतील. निवडणुकीत दिलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे’ असं सचिन पायलट यांनी म्हटलंय.मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट अनेकदा एकमेकांसोबत उभे राहिलेले दिसले.

सचिन पायलट ट्रेंडिंगवर
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झालेत. तर काही युझर्स ‘शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलट’ म्हणत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.

ज्योतिरादित्य यांनी घेतली होती पायलट यांची भेट
मंगळवारी मध्य प्रदेश काँग्रेसला ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानं मोठा धक्का बसलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ९ मार्च रोजी सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहित आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी दिल्लीतील आपल्या घरी पोहचण्याअगोदर ज्योतिरादित्य यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची भेट घेतली होती.

ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसहीत १९ आमदारांनीही आपला राजीनामा सोपवल्याचं समजतंय. आज सायंकाळपर्यंत ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्लेखनीय म्हणजे, आज सकाळी जवळपास दोन तास शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. यावरूनच ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.