साहेब ! लग्नाला 18 महिने झाले पती एकदाही भांडला नाही, कधी वादही नाही घातला, भांडणासाठी ‘आतूर’ पत्नीने मागितला ‘घटस्फोट’

लखनऊ : वृत्त संस्था – घटस्फोट शक्यतो पती-पत्नीमधील भांडणावरून होतो, परंतु उत्तर प्रदेशच्या संभलमधून एक असे प्रकरण समोर आले, जेथे पत्नी केवळ यासाठी घटस्फोट मागत आहे की, तिचा पती तिच्याशी भांडत नाही. तिचे म्हणणे आहे की, लग्नाला 18 महिने झाले, परंतु पतीने एकदाही भांडण केले नाही, एवढेच नव्हे साधा वादही घातला नाही.

पत्नीचे म्हणणे आहे की, मला असा पती नको, जो माझी प्रत्येक गोष्ट मान्य करेल आणि कधी भांडणच होणार नाही, यासाठी मला घटस्फोट हवाय. पत्नीने तलाकसाठी अर्ज शरई न्यायालयात केला होता, जो उलेमाने फेटाळला आहे. शरई न्यायालयानंतर सुद्धा पत्नी ऐकण्यास तयार नव्हती, नंतर ती पंचायतमध्ये तलाक मागण्यासाठी गेली, तेथे सुद्धा तिच्या पदरी निराशा आली. पंचांनी हे घरगुती प्रकरण असल्याचे म्हणत हात वर केले.

पत्नीचे म्हणणे आहे की, तिचा पती खुप चांगला आहे, प्रामाणिक आणि चांगल्या मनाचा आहे. पण, हिच त्याची चूक आहे. जेव्हापासून लग्न झाले आहे, तो कधी वरच्या आवाजात बोलला सुद्धा नाही. लग्नाला 18 महिने झालेत. पती-पत्नीमधील कोणताही वाद कुटुंबातील लोकांना सुद्धा ऐकला नाही. अचानक तिने तलाकसाठी शरई न्यायालयात अर्ज केला. कारण विचारले तर उत्तर दिले की, पती कधीच भांडत नाही, यासाठी घटस्फोट पाहिजे. हे कारण ऐकून सर्वजण हैराण झाले. उलेमाने अर्ज फेटाळला. शरई न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पत्नीने मोहल्ल्यातील जबाबदार लोकांची पंचायत बोलावून घटस्फोटाची मागणी केली. संपूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंतर पंचायतीने प्रकरण घरातच सोडवण्याचा सल्ला दिला.

पती भांडत नाही, माझा कोंडमारा होतो
महिलेचे म्हणणे आहे की, पतीचे जास्त प्रेम सहन होत नाही. तो माझ्यावर कधी ओरडत नाही आणि त्याने कधी मला उदास होऊ दिले नाही. भांडत सुद्धा नाही. सतत अशा वातावरणामुळे माझा कोंडमारा होत आहे. माझा जीव कोंडत आहे. तो कधी-कधी माझ्यासाठी जेवण बनवतो आणि घरातील कामात मला मदतसुद्धा करतो. 18 महिन्याच्या लग्नकाळात आमचे एकदाही भांडण झाले नाही.

मी एका भांडणासाठी आतूर झालेय
पत्नीचे म्हणणे आहे की, मी केवळ एका भांडणासाठी आतूर आहे. मी कधी एखादी चूक केली तर ते मला माफ करतात. मला त्याच्यासोबत वाद घालायचा आहे. मला असे जीवन नकोय, ज्यामध्ये पती माझी प्रत्येक गोष्ट मान्य करेल. तिला पुन्हा-पुन्हा विचारण्यात आले की, दुसरे कोणते कारण तर नाही ना, परंतु ती याशिवाय काहीही बोलत नाही.