‘पुनश्च हरिओम’ याचा अर्थ पुन्हा ‘राजकारण’ असा नाही, महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय : CM

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पुनश्च हरिओम’ याचा अर्थ पुन्हा राजकारण असा नाही. पण अनेकांनी ते सुरु केलं आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्यावर मी योग्य वळी बोलणार आहे. बोलत नाही म्हणजे माझ्याकडं उत्तर नाही असं नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना राणौत प्रकरणावरुन राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष शब्दांत ठणकावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातील जनतेला संबोधीत केले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सरकारवर होणारे आरोप, कंगना राणौत प्रकरण व मराठा आरक्षणाला स्थगितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर सविस्तर भाष्य केलं. मात्र, इतर राजकीय घडामोडींचा ओझरता उल्लेख केला. कोरोना संपालय असं वाटून काही जणांनी आपलं राजकारण सुरु केलंही असेल. तूर्त मी राजकारणावर काही बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क उतरवून एकादा मी जरुर बोलणार आहे. त्यातले धोके आणि इतर गोष्टी मी आपल्यापुढं मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाही असा नाही होत. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. त्या पदाला साजेसं काम आपल्याला करावं लागतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी आपलं अधिवेशन पार पडलं आहे. या दोन दिवसात सर्वपक्षीयांनी चांगलं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुन्हा लॉकाडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका असंही त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. मास्क लावताना शिथिलता आलेली दिसत आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला वाटतं की इतर देशांमध्ये लॉकडाऊन संपवला आहे पण कायदे कडक केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही तर दंड केला जातोय. गर्दी झाली की दुकाने बंद केली जात आहेत, असे कायदे करण्याची गरज लागायला नको असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.