…तर टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल : मोहम्मद अझरूद्दीन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. मात्र, याचवेळेस भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने संधी मिळाल्यास भारतीय संघाचं प्रशिक्षणपद सांभाळायला आवडेल असं म्हटलं आहे. सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री सांभाळत आहेत. २०१९ च्या विश्वचषकानंतर रवी शास्त्री करारमुक्त झाले होते. पण कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने पुन्हा एकदा रवी शास्त्री यांच्यावरती विश्वास टाकला होता. २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.

एका क्रीडा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अझरुद्दीन म्हणाला की, “भारतीय संघासोबत काम करण्याची संधी मिळणार असेल, तर मी नक्कीच तयार असेल. संधी मिळाल्यास मी कशाचा सुद्धा विचार न करता हे काम स्विकारेन. सध्याच्या घडीला अनेक जण संघाच्या मदतीसाठी असतात हे पाहून मला खरचं नवल वाटतं. माझ्यापुरता विचारलं करायचं झालं तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही माझी जमेची बाजू आहे. म्हणून मला भविष्यात संधी मिळाल्यास, संघाला फलंदाजी प्रशिक्षकाची गरज भासणार नाही” असं त्याने बोलताना सांगितलं.

दरम्यान, बीसीसीआयने कोरोना संसर्गाचा प्रसार लक्षात घेता आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या परिवारसोबतच वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला तब्बल ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या काळात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. तसेच ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत आयसीसीने अद्याप पर्यंत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, या स्पर्धेचं आयोजन करणं कठीण असल्याचं मत अनेकांमध्ये पाहावयास मिळतं असल्यामुळे आयपीएल चा मार्ग मोकळा असल्याचं म्हटलं जात आहे.