‘लोकसभेनंतर नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल’ : नितेश राणे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापनेनंतर आगामी लोकसभा निवडणूक ही पक्षाची पहिली लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंची जागा काय आहे हे आम्हालाही कळेल आणि इतरांनाही कळेल असे वक्तव्य आमदार नितेश राणे केले आहे. इतकेच नाही तर, शिवसेना आणि काँग्रेसने पक्षाच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. आता राणे त्यांचा स्वत:चा पक्ष वाढवणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे बोलत होते. यावेळी नितेश राणे यांना नारायण राणे यांच्या लोकसभेच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, “देश महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. आपल्या देशातील तरुणाईची संख्या जपान, चीनच्या तुलनेत जास्त आहे आणि वाढत जाईल. त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याकडे ही निवडणूक जाणार आहे. स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. आमच्यासाठी राजकीय दृष्टीकोणातून आणि राज्याच्या राजकारणात आमची जागा काय असेल हे दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.” असेही नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण एकाच पक्षाच्या झेंड्याखाली दिसू’
याच  मुलाखतीत बोलताना नितेश राणे विचारण्यात आले की,  मुलगा काँग्रेसचा आमदार, स्वत: भाजपच्या तिकिटावर नारायण राणे खासदार यामुळे तुम्हाला महाराष्ट्राने का स्वीकारावे ? या प्रश्नाला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की,  राणेंना हा निर्णय का घ्यावा लागला हे पटवून देऊ. राणेंनी ते सर्व मांडलेलेही आहे. काँग्रेसने राणेंना कोणती आश्वासने दिली होती, किती पाळली ते लोकांनाही माहित आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण एका छत्रीखाली, एकाच पक्षाच्या झेंड्याखाली दिसू, त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार नाही. अडचणी असल्याने मी सध्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहे. राणे लपूनछपून बोलणारा नाही. ते स्पष्ट बोलतात. यामुळे जनता समजून जाईल” असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिले.