पंकजा मुंडे सेनेत येणार का ? खा. राऊतांचे सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एकनाथ खडसे (Eknath khadse) यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दलही शिवसेनेत (Shivsena) प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) हेच ऑफर देऊ शकतात अस सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत. त्यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे हे ऑफर देतील. सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण काही लोकांना वाटत होतं की, हे सरकार 15 दिवसात कोसळेल. पणहे सरकार पूर्ण ताकदीने चाललेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असेही राऊत म्हणाले.

शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. ते महाविकास आघाडी सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देतात. आता याबद्दल चंद्रकांत पाटलांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कदाचित मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असतील, असे म्हणत राऊत यांनी सणसणीत टोला लगावला.तसेच, मुख्यमंत्री ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणे योग्य नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख न करता टोला लगावला.

आघाडी सरकारसमोर विरोधी पक्षाकडून आव्हान निर्माण केली जात आहेत. केंद्र सरकारला वाटत विरोधी पक्ष राहूच नये, आमच मात्र तसं नाही. आम्ही विरोधकांचे नेहमीच स्वागत करतो, असे म्हणत राऊत यांनी भाजपला कोपरखळी लगावली आहे. आज बिहारमध्ये तेजस्वी यादव हिंमतीने लढत आहे. लाखोंच्या सभा घेतोय. उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही, असंही राऊत म्हणाले.