‘राज्यातील मंदिरे 1 नोव्हेंबरपर्यंत खुली करा, अन्यथा…’, भाजपचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारनं 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांचे टाळे फोडू असा स्पष्ट इशारा भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मक आघाडीनं राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. मंदिरं उघडण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं. या भेटीनंतर त्यांनी ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.

गेल्या 7 महिन्यांपासून राज्यातील मंदिरं बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरं मात्र बंद ठेवली गेली आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी याआधीही आम्ही राज्यभर घंटनाद आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आता सरकारनं 1 नोव्हेंबरपासून मंदिरं खुली करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा मंदिरांचे टाळे फोडू अशी भूमिका भोसले यांनी मांडली आहे.

भाजपच्या अध्यात्मक आघाडीनं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितील होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ दिली गेली नाही. त्यानंतर अध्यात्मक आघाडीनं सरकारला दसऱ्यापर्यंतची मुदत दिली. अन्यथा आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला होता. अद्यापही ठाकरे सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं भाजपच्या अध्यात्मक आघाडीनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

You might also like