नवरीचा मेकअप करण्यासाठी जात होत्या बहिणी, एक जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  नगर जिल्ह्यातील केडगाव येथील केडगाव-सोनेवाडी बायपास रस्त्यावर मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या दोन बहिणींपैकी एक बहीण जागीच ठार झाली. मनीषा कापरे या अपघातात मृत्यू झाला आहे. तर रेखा चव्हाण ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

मनीषा आणि रेखा या दोन्ही बहिणींचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात अटी शिथिल झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून अडकून पडलेले लग्न सोहळे आता पार पाडले जात आहे. सोनेवाडी इथे एक लग्न सोहळा संपन्न होत आहे. मनीषा आणि रेखा या सोनेवाडी येथे एका नववधूचा मेकअप करण्यासाठी निघाल्या होत्या. सोनेवाडी बायपास चौकात पोहोचल्या असता अरणगाव च्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी ट्रकच्या धडकेने एका बहिण जागीच ठार झाली तर एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी रेखा चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला आहे. दरम्यान, केडगाव सोनेवाडी बायपास चौकात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या चौकांमध्ये आत्तापर्यंत अपघातच नऊ जणांचा बळी गेला आहे. या चौकात वारंवार अपघात होत असतानाही बांधकाम विभागाकडून या चौकात सुरक्षेच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली.