संतापजनक …! ‘कॉपर टी’ चुकीच्या पद्धतीने बसवल्याने बाळंतणीचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कॉपर टी चा पर्याय सर्रास वापरला जातो. पण ठाण्यातील एका महिलेला चुकीच्या पद्धतीने कॉपर टी बसवण्यात आल्यामुळे महिलेचा यात मृत्यू झाला आहे. ही महिला २१ वर्षीय असून एका महिन्याच्या प्रसूतीनंतर तिने कॉपर टी बसवून घेतली होती. ही धक्कादायक घटना भिवंडी येथील भादवड परिसरात घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भादवड येथे राहणारी २१ वर्षीय विवाहिता सपना राजकुमार गौतम या विवाहितेची एका महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात तिची प्रसूती झाली होती. त्यानंतर लगेच दुसरे मुलं नको म्हणून तिने कॉपर टी बसवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार याच रुग्णालयात तिला कॉपर टी बसवण्यात आली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र, दोन दिवसांपासून तिच्या पोटात अचानक त्रास सुरू झाला. सोमवारी सायंकाळी तिला उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या मृत्यूची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सोनावणे करत आहेत.

तिच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या चुकीमुळे फक्त एक महिन्यापूर्वी जन्मलेल्या तान्हुल्याला आपली आई गमवावी लागली .