50 युवकांशी शुभमंगल ! लग्न करून पळून जात होती नवरी, अखेर सापडली पुणे पोलिसांच्या जाळ्यात; टोळीतील 9 महिला अन् 2 पुरूषांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाह इच्छुक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासबोत खोटे लग्न करुन पैसे, दागिने घेऊन पळून जाणाऱ्या नवरीच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक कुटुंबांना लुटल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मुख्य आरोपी ज्योती रविंद्र पाटील (वय 35 रा. केसनंद फाटा वाघोली) या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने नाशिक, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वापी आणि कोल्हापूर येथील नागरिकांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मावळातील 32 वर्षीय तरुणाने वडगावं मावळ पेालीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे खोटे नाटक करुन ही टोळी महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक राज्यात सक्रिय झाली होती. या महिलेनं आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरुषांना फसवून त्यांच्याशी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू आणि कपडे घेऊन पसार होत होती. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कर्मचारी एका गुन्ह्याचा तपास करीत असताना तक्रारदार तरुणाने ज्योती पाटील ही महिला एक महिन्यापूर्वी भेटली होती. तिने लग्न लावून देण्याचे सांगत अडीच लाख रुपये घेतले. लग्नानंतर लग्न केलेल्या मुलीने तक्रारदाराच्या घरातून अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला होता.

या टोळी अशा प्रकारे 50 कुटुंबाची फसवणूक करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. परंतु, सामाजिक प्रतिष्ठेमुळे फसवणुक झालेल्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे या आरोपींची माहिती पोलिसांना मिळू शकत नव्हती. मात्र, आता पोलिसांनी फसवणूक झालेल्यांची चौकशी सुरु केली आहे. परंतु यातील अनेकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिस सूत्रांकडून समजत आहे.

विवाह इच्छुक तरुणाची अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीची सध्या चर्चा सुरु आहे. त्यातच लग्न करताच दोन दिवसांनी माहेरी जाऊन परत येते, असं सांगून सोनं आणि पैसे घेऊन नवरीच पळून जात असल्यामुळे तक्रार कशी करावी असा पीडित कुटुंबासमोर गहन प्रश्न असायचा. समजात आपली पत खराब होईल या भीतीने कोणी तक्रार केली नसल्याने या टोळीचे चांगलेच फावले. याचा फायदा घेऊन या टोळीने अनेकांना गंडा घातला. अखेर एका तरुणाने धाडस करुन पोलिसांत तक्रार केल्याने या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.