पुणे-नगर-पुणे प्रवास पडला महागात, शासनाचे आदेश डावलणाऱ्या महिला अधिकाऱ्यास घेतले ताब्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-नगर-पुणे असा प्रवास केला. हा प्रवास करणं गवांदे यांना चांगलेच महागात पडले आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता कविता गवांदे या प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही बाब लक्षात येताच श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास करताना ताब्यात घेतलं आहे.
जिल्हा बंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने ही करवाई केली असून कविता गवांदे यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याति गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबेदणाले आहेत.

अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावर महसूल प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गवांदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्या पुण्याहून नगरला प्रवास करत असताना कोणतीही परवानगी न घेता त्या दररोज पुणे – नगर प्रवास करत होत्या, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आदेश दिले आहेत. त्यात जिल्हा बंदीचाही आदेश आहे. मात्र, त्यांच्या या आदेशात प्रशासनातीलच अधिकारी हरताळ फासत आहेत.

कविता गवांदे या आज (गुरुवार) सकाळी पुणे-नगर प्रवास करत होत्या. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. गवांदे यांना पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्याचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी तहसीलदार चारुशीला पवार आणि योगीता ढोले यांच्या पथकाने थांबिवले. परवान्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे शासनाचा कोणताच परवाना नसल्याने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.