हृदयद्रावक ! विवाहितेची २ चिमुकल्यांसह पेटवून घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका विवाहितेने दोन चिमुकल्यांसह पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावातील ही घटना आहे. स्वाती पाटील (वय 30) असे या महिलेचे नाव असून मुलगी विभावरी (4) व मुलगा शिवांशू (1 वर्ष) अशी चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, स्वातीचा विवाह लष्करी सेवेत असणार्‍या महेश पाटील यांच्याशी २०१२ मध्ये झाला होता. महेश सध्या राजस्थान येथे सेवा बजावत आहेत. स्वातीचे आई-वडील मुंबईत वास्तव्यास असून, ती दोन मुलांसह सासरे शिवाजी पाटील व सासू यांच्याबरोबर नेर्ले गावात राहत होती. मुलगी विभावरी कोकरूड (ता. शिराळा) येथील एका शाळेत शिकत होती.

काहीच न समजणारी चिमुकली आईला बिलगली…

गुरुवारी सकाळी सासरे शिवाजी पाटील गावात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते, तर सासू शिवांशूला घेऊन शेजारच्या घरात बसल्या होत्या. साडेअकराच्या सुमारास स्वातीने शिवांशूला दूध पाजून आणून देते म्हणून सासूकडून घरी आणले. त्यानंतर तिने दोन मुलांसह घरात खोलीचा दरवाजा लावून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. घरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येऊ लागल्याने शेजारील लोकांनी शिवाजी पाटील यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर नागरिकांनी दरवाजाची कडी तोडून खोलीमध्ये प्रवेश केला. दोन्ही लहान मुले स्वातीला बिलगल्याने तीही यामध्ये होरपळली होती. स्वाती व मुलगी विभावरी यांचा गंभीररीत्या भाजल्याने जागीच मृत्यू झाला होता. तर मुलगा शिवांशू गंभीर होरपळला होता. त्याला उपचारासाठी भेडसगाव येथील रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.

या घटनेने पाटील कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे. स्वातीने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. या घटनेची माहिती पोलिस पाटील सौ. दीपाली गवळी यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली.