महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करणार्‍यानेच केला महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिला दिनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजन करणाऱ्या आयोजकानेच महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे़. नाना डोळस (रा़ राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. ही घटना आळंदी गावातील वडगाव चौकात रविवारी दुपारी तीन वाजता घडली आहे.

या प्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलने आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. फिर्यादी या आळंदीतील वडगाव चौकात नारळ पाणी आणण्यासाठी गेल्या. तेथे आरपीआय संघटना खेड यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपला होता व कार्यकर्ते निघून जाण्याच्या तयारीत होते. तेथील कार्यक्रमाचे आयोजक नाना डोळस तेथेच उभे होते.

फिर्यादी या त्यांच्या घरमालकिनीबरोबर कार्यक्रमास जात असल्याने डोळस फिर्यादी यांना ओळखत होते. फिर्यादी रस्त्याने जात असताना डोळस यांनी त्यांना हाक मारुन बोलवून घेतले़ व तुम्ही कशाचा उगाच वाद उकरुन काढता असे बोलून त्यांच्या उजव्या हाताला स्पर्श केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचा हात झटकला. त्यावर डोळस फिर्यादी यांना म्हणाले की, आम्ही तुझ्या घरमालकिणीचा माज मोडला आहे. असे म्हणून भर रस्त्यात त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले व त्यांना तुम्हा सर्वांना पाहून घेतो, असा दम दिला.