हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात लोकसभेचे वातावरण तापत आहे, तसं उन्हानेही जोर धरला आहे. आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते उन्हातान्हात पायपीट करत आहेत. त्यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना उन्हात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आजारी असल्यामुळे रोहित पवार सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस हडपसर येथील रुग्णालयात अॅडमीट व्हावं लागलं. ऑपरेशन करावे लागले. या काळात पक्षाचे कार्यकर्ते, मित्र हितचिंतक यांनी काळजीतून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना उत्तर देता आली नाहीत. हॉस्पीटलचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आता पूर्णपणे बरा असून पुन्हा त्याच जोशाने प्रचारास सुरवात करत आहे., असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

माझी आपणा सर्वांना हिच विनंती आहे की, आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे फक्त त्याचसोबत आपली तब्येत तितकीच जपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.