व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे युवतीची आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे सावेडी उपनगरातील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात कोल्हापूर येथील तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत धायगोंडे, पल्लवी धायगोंडे, सागर धायगोंडे (सर्व रा. कोल्हापूर, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की मयत युवतीची प्रशांत धायगोंडे यांच्यासोबत ओळख होती. त्याने तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच यापूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. व्हिडिओ वायरल करण्याच्या धमकीस घाबरून तिने काल दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रशांत धायगोंडे व इतरांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस येताच रात्री उशिरा तिच्या भावाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने युवतीच्या आत्महत्येमुळे शहरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Visit – policenama.com