‘त्या’ खूनप्रकरणी : पोलीस उपनिरीक्षकाची येरवड्यात रवानगी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अनिकेत कोथळे खूनप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम अनुपस्थित असल्याने जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली. या खटल्याची सुनावणी १२ मार्चपासून सुरु होणार असून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कावळेसाद (आंबोली) येथे नेऊन जाळला होता. याप्रकरणी  कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खटल्याची न्याधीश सापटणेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे यालाही अटक करण्यात आली होती. मात्र खटल्यातून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात सीआयडीने संशयितांविरोधात गोळा केलेले पुरावे मंगळवारच्या सुनावणीवेळी न्यायालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र अ‍ॅड. निकम अनुपस्थित असल्याने दि. 12 मार्च रोजीच आता पुरावे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान यातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याला काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी त्याला येरवड्याहून सांगलीला आणण्यात आले होते.